Ad will apear here
Next
..आणि माझी अवस्था विक्रमादित्यासारखी झाली
पहलगाम

मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत पहलगामला यावं लागणार होतं. बॅगरूपी वेताळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणं केवळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के. काय करावं..? माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारल्याने संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली होती.. स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा दहावा भाग...
............................................................................
लीडर नदी, पहलगाम, काश्मीरबेस कॅंपच्या बरंच आधी बस थांबली. माझी जड बॅग उचलायचं मला जीवावर येत होतं. खूपच थकवा जाणवत होता, पण पर्याय नव्हता. पाठीवर रकसॅकचा संसार उचलून ‘मै बंजारा..’, ‘दिवाना.. मैं चला उसे ढुंढने बडे प्यार से..’ भाव मनात दाटीत चालू लागलो. डाव्या हाताला वेगात, खळखळ  आवाज करत लीडर नदी वाहत होती. लीडर नदीचा जन्म पर्वतांमधला. आकाशाचा फिरोजा रंग आणि अवती-भवतीच्या निसर्गाचा हिरवा रंग स्वतःत शोषून घेत ती वाहत होती. किंचित हिरवा, जास्तीत जास्त फिरोजा रंग आणि फेसाळता शूभ्र रंग, अशी ही त्रिरंगी नदी आपल्याच नादात धावत होती. 

वाहताना खळाळता नाद निर्माण करीत होती. तो खळखळाट  खूप कर्णमधूर वाटत होता. वातावरणात आणखी चैतन्य ओतत होता. प्रवाहाचा हिरवा, निळा रंग हा शेवाळाचा नव्हताच! नदीत कुठेही शेवाळं साचलं नव्हतं. शेवाळाला साचायला संधीच देत नव्हती ती जणू. इतक्या वेगाने जात होती. जगत होती, वर्तमानात राहून मार्ग कंठीत होती. भूतकाळात वा भविष्यकाळात जगताना उदासीनतेचं शेवाळं साचत असतं. ती मात्र हातात नसलेल्या या दोन्ही काळांना फाट्यावर मारून फक्त वाहण्यावर, वर्तमानात लक्ष केंद्रित करत होती. काही मूर्ख लोक तिच्यात प्लास्टिक बॅग्स, वस्तू टाकत होते. भारतीयांची ही खोड सतत शिक्षा मिळाल्याशिवाय जाणार नाही.

मी आणखी समोर पोहचलो, तेव्हा प्रथम आर्मीचं तपासणी केंद्र दिसलं. तिथे मेटल डीटेक्टरद्वारे बॅगेची आणि माझी तपासणी झाली. एका बाजूने खूप तंबू लागलेले दिसत होते. पुढे जवळपास दोन कि. मी. चालल्यावर बेस कॅंपच्या प्रवेश स्थानापाशी पोहचलो. तिथेही खूप आर्मी सैनिक होते. तिथल्या लाऊड स्पीकरवरून सतत सूचना सुरू होत्या. पुन्हा कसून तपासणी झाली आणि आत प्रवेश मिळाला. समोर एक जरा रिकामा भाग असलेला चौक होता. तिथे एका भागात अमरनाथ गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता, तो किती फूट, काय काळजी घ्यावी यासंबंधी मोठा फोटो आणि फलक लावला होता. दोन मोठया तंबूत पलंगासहित दवाखाना आणि मेडिकल स्टोअर होतं. 

पहलगाम बेस कॅंप, काश्मीरसमोर जाताच काही काश्मिरी तरुणांचे तंबूसाठी गळ घालणे सुरू झाले. किती जण आहात.., आमच्या तंबूत सीएफएल लाईट आहे, मोबाईल चार्जिंगची सोय आहे. मी एकटा असल्याने तंबू मिळवताना अडचण होऊ शकते, हा अंदाज होताच. पण कोणतीही अडचण न येता तंबू ठरला आणि मी त्या काश्मिरी मुलासोबत तंबूस्तानाकडे जाऊ लागलो. एकसारखेच दिसणारे खूप सारे तंबू होते. उंचच उंच वृक्षांमध्ये, छोट्याश्या जंगलात तंबू ठोकले होते. ते एक टुमदार तंबूंचं छोटं गावच वाटत होतं. मी त्या काश्मिरी माणसामागे चालत होतो. अनेक तंबू मागे पडल्यावर शेवटी त्याने त्याचा तंबू दाखवला. त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देऊन पावती घेतली. तंबूत शिरताच मी माझ्या पाठीवरील वजनदार वेताळाला खाली उतरवले. आत दोघेजण होते. ते खूप निवांत बसले होते. जणू या यात्रेचा पूर्वानुभव त्यांच्याकडे होता.

तंबूतील त्या दोघांशी बोलणं झाल्यावर कळलं, की ते बरेच अनुभवी आहेत. त्यांनी काही मौलिक अनुभवी बोल, सूचना दिल्यावर मला मी जम्मूतच केलेल्या एका मोठ्या चुकीची जाणीव झाली. ते म्हणाले, इतकी मोठी बॅग सोबत बाळगून जाणं केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा इथेच बॅग लॉकरमध्ये ठेवा आणि परत इथेच येऊन बॅग घेऊन जम्मूला परत जा. मला संपुर्णपणे जाणीव झाली मी केलेल्या मोठ्या चुकीची! मी जम्मू बेसकॅंपमध्ये बॅग ठेवली नाही, ही मोठी चूक झाली होती. तेव्हा लक्षात आलं की बहुतेक लोक मोठ्या बॅग्स, सामान जम्मूतच लॉकरमध्ये ठेवून पायी चढण्यासाठी पाठीवर छोटी बॅग घेऊन आले होते. त्याहीपेक्षा मोठा, हिमालयाएवढा प्रश्न हा पडला होता, की मी माझा पाठीवरचा वजनदार वेताळ इथेच ठेवला, तर मला परत इथे यावं लागेल. पण दर्शनानंतर गुफेपासून माझा परतीचा मार्ग पहलगाम नसून बालताल होता. बालताल आणि पहलगामचा दूर दूरपर्यंत संबंध नाही.

काय करावं..? माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारल्याने संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली. पहलगाम ते अमरनाथ गुंफा हा तीन रात्री मुक्काम असलेला दूरचा मार्ग आहे. मी त्या मार्गाने जात होतो. अमरनाथ गुंफा ते बालताल हा फक्त सात ते आठ तासांचा प्रवास आहे, त्यामुळे जवळपास शंभर टक्के पहलगामहून जाणारे लोक बालतालच्या मार्गाने परतीचा प्रवास करतात. यामुळे त्यांचे दोन्ही रस्त्यांवरील प्रवास होऊन वर्तुळ पूर्ण होते. मी ही तेच करणार होतो. परंतु मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत पहलगामला यावं लागणार होतं. बॅगरूपी वेताळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणं केवळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के. 

वेताळाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी अडचण आणि नाही दिलं तर मस्तकाचे शकलं होणार.  संकटात सापडलेल्या राजा विक्रमादित्याप्रमाणे माझी अवस्था झाली. तेव्हा मी पाठीवर रकसॅक घेऊन जीवावर उदार होण्यापेक्षा जीवावर मोठा दगड ठेऊन, गुफेतील दर्शनानंतर बालताल या छोट्या रस्त्याने सगळ्यांसोबत न जाता दूरच्या मार्गाने परत पहलगाम बेसकॅंपलाच यायचे ठरवले. तंबुतील त्या दोघांनी सुचवल्याप्रमाणे पाठीवरील मोठा वेताळ पहलगामला लॉकरमध्ये सुरक्षित ठेऊन छोटी बॅग विकत घेतली. त्यात अगदी कामाचे गरम कपडे घेऊन चढायचं ठरवलं आणि एक पाठीवरील छोटी हलकी ‘बॅगवती’ घेण्यासाठी मी बाहेर पडलो.

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZOIBJ
Similar Posts
..आणि सामान्य माणूसही होतो जिगरबाज सैनिक.. अमरनाथ यात्रा पुढे धार्मिक न राहता ती हळूहळू राष्ट्रीय यात्रा होऊ लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता तिथे जाणारा सामान्य माणूसही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो
आत्मीयतेने मोफत जेवू घालणारे लंगरवाले... इतक्या उंचावर जिथे सर्व महाग मिळतं, तिथे हे लंगरवाले यात्रेकरूंना मोफत चविष्ट अन्न खाऊ घालतात. आश्चर्य म्हणजे अन्न वाढताना कसलाही अहंकार नाही, का कटू, कोरडा व्यवहार नाही. अत्यंत प्रेमाने, आर्जवतेने ते यात्रेकरूंना आपल्या लंगरमध्ये बोलावत असतात. जणू त्यांच्यातच एक सशक्त स्पर्धा असते, कोण जास्त यात्रेकरूंना खाऊ घालेल, कोणाचं अन्न जास्त रुचकर
‘आवो भोले.. पिस्सू टॉपतक घोडा कर लो..!’ आजूबाजूला शुभ्र बर्फ होता, पण चालायच्या वाटेवरचा बर्फ माती, चिखल आणि धुळीनी काळवंडला होता. बर्फातही मळलेली वाट असते. दोन्ही बाजूंना असलेले उभे, उंच पर्वत धीर खचवत होते. खळाळती नदी उत्साह वाढवत होती. माझी पिस्सू टॉपची कठीण चढाई सुरू झाली होती... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या
पिस्सू टॉप सगळ्यात मोठं, उभं, उंचच उंच संकट, टास्क, चॅलेंज पुढे उभं ठाकलं होतं. त्याचं नाव म्हणजे ‘पिस्सू टॉप’. अमरनाथ यात्रेत जे दरवर्षी मृत्यू होतात त्यात दोन ठिकाणी सगळ्यात जास्त मृत्यू होतात. एक पिस्सू टॉप आणि दुसरा शेषनाग. पिस्सू टॉपच्या खडतरपणाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. मी जन्मभर कधीही विसरणार नाही असा अनुभव पिस्सू टॉपने दिला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language